Wednesday 13 May 2015

मे - MAY

मे - MAY

खरतर मी महिना सुरु होऊन हि जवळजवळ १५ दिवस होत आले आहेत, तुमच्या आंब्यांनी भरलेल्या मनात हे येण साहजिक आहे …. आता हि बया काय सांगतीये….

आम्हाला एप्रिल संपला काय आणि मे सुरु झाला काय हे फक्त एका गोष्टी वरून कळायचे :-)

अर्थात १ मे रिझल्ट चा दिवस, यानंतर आम्हाला काय रान मोकळेच…. मी, माझे बालपण, मित्र मैत्रिणी  सगळे शहरात वाढलेले, आणि गावाशी फारसा संबध नसलेले त्यामुळे माझ्या लहानपणी सूरपारंब्या आणि शेतातली सफर, आंब्याच्या झाडावर बसून खाल्लेले आंबे, शेतातल्या ओढ्यात किंवा विहिरीत मारलेल्या उड्या, शेतातल्या घरातील चांदण्याच्या रात्री, मामा चा गाव, असे काही काही नाही त्यामुळे वाचकांची घोर निराशा कदाचित माझ्यामुळे होऊ शकेल…. पण मी तर काय करू :-(

नाही म्हनायला माझे बाबा मला उन्हाळ्यात रोज नदीला पोहायला घेऊन जायचे, ते एकदम पट्टीचे पोहणारे असले तरी त्यांनी माझापाठीचा डबा कधीच काढला नाही त्यामुळे मला फक्त काठावर बसून डुंबायला येते

 सध्या तरी मी एकाच मे महिन्याबद्दल सांगेन ,माझ्या लहानपणी गल्लीतील आम्ही जवळजवळ २५-३० जण एकाच वयाची होतो, मस्त ग्रुप  होता ( घरातल्यांच्या भाषेत सांगायचे तर टोळी ), आणि त्यातही डोक्याने सुपीक असलेल्यांची बिलकुल कमतरता नसल्याने रोज एक नवीन पिक आमच्या डोक्यात असायचे,

मला लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड, त्यामुळे माझ्या डोक्यातील एक पिक, आपण लायब्ररी सुरु करू, सर्वांनी अतिशय दणाणून प्रतिसाद दिल्याने एका दिवसात गल्लीत किमान ४-५ तरी लायब्रर्या सुरु झाल्या… ५ रुपये डीपोझीट आणि महिना २ रु भाडे ( अरे हे तर घर भाड्याने घेतोय असे वाटतंय ) … खुन्नस पार्टीकडे जायचे नाही, माझ्याकडेच यायचे अशा गोड हट्टामुळे बरीच पुस्तके इकडची तिकडे झाल्यावर आठवड्यात हा कार्यक्रम बंद पडला अर्थात हा फक्त दुपारचा होता

संध्याकाळी आम्ही सारे मिळून लपंडाव खेळायचो, ज्याच्यावर डाव येईल तो २-३ दिवस डावच फेडत असायचा शेवटी रडून झाले कि मग परत नवा गाडी ( काय करणार इतके जण  होतो कि ज्याच्यावर डाव येईल त्याला लक्षातच राहायचे नाही कि कोण आउट आणि कोण नाही) एक दिवस घळसासी काकांचे घराचे बांधकाम चालू होते, तिथे लपलो सगळे आणि काय नशीब नेमके ते तिथे उपटले …. पोरांना अगदी सांगता येत नाही अशा ठिकाणी फटके लावले आणि आम्हाला खास घरी नेउन पोहोचवण्यात आले… मग काय घरी आरतीच ….

आता दुपारी काय करायचे अशा अडचणीतून एका मैत्रिणीने वाट काढली, आपण ग्रीटिंग कार्ड्स तयार करूया, आणि विकूया… चल सगळी झुल्लड परत खरेदीला… कार्ड लवकर करायच्या गडबडीत रंग ओले असतानाच काळ्या स्केचपेनने बोर्डर करणे वैगरे घोळ घालून आम्ही एकदाची कार्ड्स तयार केली…. ३-४ दिवस हेही झाले आणि आम्ही चौकात प्रदर्शन भरवले…  पण काय वाईट वाटले माहितीये….कुणीच आले नाही खरेदीला…. कारण तो चौक इतका आत होता कि कोणाला कळणे  केवळ अशक्य होते B-)
शेवटी आम्ही आमच्याच आईबाबाला पकडून आणून त्यांच्या गळ्यात आमची कला मारली

एक दुपारी इमली कॅन्डी करायचे ठरले…. मग काय परत सारे खरेदीला, वर्गणी काढून चिंच पाव किलो घेऊन आलो…. आणि प्रत्येकाकडे एक एक समान वाटले जसे गुळ, तिखट , मीठ , आणि मुख्य बत्ता हे सारे घरातून चोरून आणावे लागे (आपापल्या ) मग एका दुपारी टळटळीत उन्हात सगळ्या स्वार्या तोंडचे पाणी आवारात एकीच्या टेरेसवर भेटल्या…. कदाचित चिंच कुटताना किंवा आम्ही घातलेल्या गोंधळाच्या आवाजाने तिच्या आईला जाग आली आणि आम्ही बत्त्यासकट पळ काढला….

मग संध्याकाळी सायकलिंग चा प्लान ठरला पण सगळ्यांकडे सायकल नसल्याने ती भाड्याने काढावी लागे आणि त्यात पुन्हा संख्या जास्त त्यामुळे जवळपासच्या सगळ्या दुकानात नंबर आमचाच अशी २ तास साधना झाल्यावर एकदाची सायकल हातात मिळायची ती शक्य तेवढ्या फास्ट रंकाल्याकडे दामटायची…(रंकाळा हा आमच्या जवळच्या एका मोठ्या तलावाचे नाव आहे ) त्यावेळी संध्यामठाकडील घाट बांधला नव्हता आणि एक जमिनीचा पट्टा  लांब आतवर पाण्यात गेला होता  तिथे जाऊन गप्पा मारायच्या आणि कोणाकडेही पैसे नसल्याने भेल etc न खाताच गुपचूप मागे यायचे कारण सायकल भाड्याची… भाडे वाढतेय … कदाचित आज पुण्यातील घराचे भाडे वाढल्यावरही इतके वाईट वाटत नाही….

एक दिवस संध्याकाळी भेळेच प्लान ठरला , पुन्हा वर्गणी काढली , आणि असे ठरले कि टोमाटो, कांदा आणि फरसाण हे  घेऊन यायचे मग भेळ मिळेल…. (मग वर्गणी कसली … असे प्रश्न आज पडत आहेत  तेंव्हा काही नाही ) काय मस्त लागली माहिती आहे ती भेळ…. चला तोंडाला पाणी सुटलं ….

एका मैत्रिणीच्या घरी दुपारी व्यापार खेळायला जमलो … अडगळीच्या खोलीत …. आणि खेळ बाजूलाच राहिला आम्ही भुताच्या गोष्टी एकमेकांना सांगत होतो… आणि अचानक एका उंदीर आला आणि मागोमाग एक मांजर पण आणि आम्ही सगळ्या भर दुपारी सगळ्यांची झोपमोड केली … मग आमचे काय झाले हे सांगण्यासारखे नाही…

अजून मे महिन्यातले सिनेमे, रात्रीचे badminton , कट्ट्यावरच्या गप्पा , एक दिवसाची ट्रीप, कुत्री मांजरे पाळणे , अभ्यासाचा प्लान तयार करणे , हे आणि असे अजून चिक्कार उद्योग आम्ही केलेले आहेत त्यामुळे आज माझ्या मुलीला हे सगळे सांगताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहायला मला खूप आवडतात …. तिला सगळे परीकथेसारखे वाटत असते …. आणि मी जुने क्षण परत जगून घेते ….

 






1 comment: