Friday 30 January 2015

चौघीजणी



गेल्या आठवड्यात चौघीजणी वाचले… खरतर मी या अत्यंत सुंदर आणि मृदू पुस्तकाची पारायणे केली आहेत … जवळजवळ पाच वर्षा पूर्वी मला ते मिळाले …. आणि मी वेडी झाले या साठी शक्य तेवढ्या वेळा मी हे पुस्तक भरभरून वाचले आहे … लुईसा मे अल्कोट चे अप्रतिम लिखाण आणि शान्ता शेलाकेंचे अनुवादन …. अतिशय तरल, मऊ,  मनाला स्पर्शून जाणारे लेखन …. जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वीचे, दूर देशातले, विभिन्न सामाजिक परिस्थितीतले पण तितकेच आपले, घरातले मनातले….

काही वेळा मला यांचा अतिशय हेवा वाटतो…. मी का नाही त्यातली एक…. ते प्रेम, जिव्हाळा, प्रत्येकाचे लहान मोठे गुण अवगुण ओळखून त्यांना मार्मि आणि पापांनी दिलेला आधार… उत्कट लॉरी, सुंदर मेग, धाडसी ज्यो, निष्पाप बेथ, कलाकार अमी…. अगदी आदर्श नाती आणि घर …. आपल्याला प्रेमाच्या नात्यात गुंफणारे, त्यांच्या प्रेमात पाडणारे….

कधी खूप एकटे पण वाटला, मन भरून आले, खूप low वाटले तर हमखास हे पुस्तक सहज उघडावे आणि जे उघडेल त्या पानापासून पुढे वाचण्यास सुरु करावे असे माझे कितीदा  तरी झाले आहे…. आणि प्रत्येक  पानावरून अतिशय मृदू भाषेत आपली समजूत घालते हे पुस्तक…. इतक्यांदा हे पुस्तक वाचूनही काही विशिष्ठ प्रसंगी माझे डोळे भरून येतात आणि झरझर पाणी वाहू लागते आणि मनातले सगळे वाहून जाऊन आपण परत फ्रेश…. खरच जर पुढचा जन्माचा choice असेल तर मला  नक्कीच त्यांच्यात जायला आवडेल ….  

Wednesday 21 January 2015

आईपण

आई आणि मुलं

                   जन्माच्या आधीपासून जोडलेलं नातं, किती तरी  बोलला गेलेला विषय… आज मी काय लिहाव यावर आणि काय बोलवे… सर्वाना वाटते आई  होणे म्हणजे परमानंदाची स्थिती… आईपण म्हणजे स्त्रीत्वाचे साफल्य…. तिची जबाबदारी… मुल असणे व नसणे हे तिच्या अस्तित्वाशी जोडलेलं…. पण हे आईपण एखाद्या स्त्रीला नको असू शकते किंवा कधी हवे आहे याचा निर्णय तिला घ्यायचा असेल तर …. आपला समाज , विचार , रूढी तिला खरच  देतात का हा हक्क  …?

                   का येते तिला दडपण आता मुल नको हे कबूल करताना….? किंवा मला नकोच मुल असे म्हणताना … सासर, माहेर हे सारे का नाही तिला निर्णय घेऊ देत… आपल्या शरीरात पोसणारा जीव, आपला अंश, जन्माला घालताना होणारा प्रचंड शारीरिक त्रास, नंतर मुल  मोठे करताना होणारी दमछाक हे सर्व बाईनेच निभवायचे असले तरी तिला हक्क नाही निर्णयाचा असे का ….? बहुतेक स्त्रिया मनातून आई व्हायला आतुर असतात…. पण तरीही आपले मुल कधी असावे या बद्दल त्यांची काही मते असतात. बहुतेक वेळेला हि मते विचारात घेतली जात नाहीत आणि तिला पटवून दिले जाते कि आता लगेच बाळासाठी प्रयत्न करणे किंवा लांबणीवर टाकणे हे खूप महत्वाचे आहे… वय, आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्थिती या सर्वापेक्षा जास्त महत्वाचे आहे आईची मानसिकता , तिची तयारी, तिच्या इच्छा कारण हे शिवधनुष्य तिला पेलायचे आहे… खरच त्या वेळेला आई -वडील आणि बाल यांच्यातील नाते प्रेम घट्ट असेल जेंव्हा आई शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आईपण पेलण्यासाठी तयार असेल…. आणि आता आपण सर्वांनी तिला तो हक्क दिला पाहिजे. 

                   मी माझ्या आजूबाजूला किती वेळा अशी परिस्थिती पाहिली आहे कि नवरा सासरचे लोक ठरवतात कि आता आपल्याला मुल हवे पण तिला विचारलेच जात नाही जिला हे सर्व करायचे आहे , माझे असे म्हणणे नक्कीच नाही कि फक्त आईच्या मताप्रमाणे ठराव्या सार्या गोष्टी…. पण तिचेही मत विचारात घेतले जावे इतकीच अपेक्षा आहे… आणि हे समाजाच्या साऱ्या स्तरातून व्हावे, मी खूप वाट पाहत आहे याची.



Monday 12 January 2015

तुझ्याजवळ

तुझ्याजवळ अगदी जवळ राहावे असेच सतत मला वाटते……

कधी कधी वाटते तुझा मोबाईल व्हावा, म्हणजे कायम मला जवळ ठेवशील
पण परत वाटते मोबाईल out of coverage गेला तर…….

कधी कधी वाटते तुझा keyboard व्हावे, म्हणजे कायम मला जवळ ठेवशील,
कुरवाळशिल, सतत तुझे हात माझ्या अंगावरून फिरत राहतील आहा हा हा
पण परत वाटते राग आला तर keyboard आपटलास तर….

कधी वाटते तुझी गाडी व्हावे, म्हणजे तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या बरोबर असेल,
average कमी झाले म्हणून गाडी बदललीस तर….

कधी वाटते तुझी सावली व्हावे,म्हणजे तुझ्या प्रत्येक क्रियेला प्रतिसाद देईन मी,
पण रात्र झाली आणि मी एकटी पडले तर….

कधी वाटते तुझे स्वप्न व्हावे, आणि तुझ्या  नवनवीन ध्येयामध्ये तुला साथ द्यावी
पण रात्र संपल्यावर तू डोळे उघडलेस तर…..

कधी वाटते तुझा श्वास व्हावे, सतत तुझ्यामध्ये सामाऊन जावे,
पण कधी श्वासाने साथ सोडली तर……

काय करू असे काय होऊ मी कि मी कायम तुझ्या बरोबर असेन…?

मी तुझा आत्मा होइन… आणि सतत तुझ्यात असेन तुझ्या बरोबर असेन
 मग तू कोठेही असशील तरी मी तुझी साथ देईन कायम….