Monday 25 May 2015

वांग, लेक आणि हॉस्पिटल

वांग, लेक आणि हॉस्पिटल

त्यादिवशी बाईचे प्रेमपत्र आलेच माझ्या हातात …. :-) लेकीच्या शाळेतल्या बाईचे मिस् चे …. आमच्याकडे बाकी कसलेही प्रेमपत्र किंवा पत्रातील प्रेम सापडायची तिळमात्र शक्यता नाही… अरसिक नवरा दुसरे काय … मी त्याला म्हणतीये बाबा मला नाही लिहिलेस तरी चालेल पण कोणाला तरी लिही … पण हा बाबा फारच संत -सज्जन मिळाला काही एक्साईटमेंट नाहीच आयुष्यात  … बर लेटर … तिच्या शाळेत वेजिटेबल डे होता …. आणि पोरांना भाज्या करून पाठवायचे होते … डब्यात नव्हे …. मलाच काय आनंद … किती दिवसांनी मला माझे कलागुण दाखवायची संधी मिळाली होती …. लेकीची शाळा बिल्डरकडून घर ताब्यात मिळायच्या घोळामुळे ४-५ महिने चुकली होती आणि त्यात माझे बरेचसे डेज वाया गेले होते …. पण आता मी शांत बसणार नाही …. माझी कला मला बोलावते आहे …. "मग रोज जेवणात काय असते," इति नवरा … खर तर हा प्राणी दिवसा घरात असण्याची शक्यता नसते पण …. गेले दोन दिवस माझा सासुरवास चालू आहे ….

फार लवकर करायला नको …. नाही तर चिरलेली भाजी शाळेत घेऊन जावी लागेल असा सुज्ञ विचार कधी नव्हे ते डोक्यात आला ……. पण विचार तर केलाच हवा …. बटाटा करावा काय कि टोमाटो …. कारले छान आहे ऑप्शन, पण करणार कसे यात जर कला फिरायला गेली …. च्या आयला …. यापेक्षा खरी भाजी करून डब्यात घालून पाठवावी असा विचार आलाच पण … मी त्याला हाकलून लावून कलेवर (माझ्यातल्या ) विश्वास ठेवला … बरच ब्रेन स्ट्रोमिंग झाल्यावर आठवले वांगे …. मग मी फिक्स चल आता वान्गेच करावे ….

आदल्यादिवशी रंगीत कागद , कार्डशिट असे सगळे गोल केले व लेक झोपली असल्याचा मुहूर्त साधून वांगे करायला घेतले …. काळ वेळचे भान हरपल्यामुळे लेक उठली व तिच्यासाठी वांग्याचा बेत लांबणीवर टाकून वरण भात केला… मग एका छोट्या लढाई नंतर तो संपला … चलो वांगे बुला रहे है…!!!

अथक परिश्रमानंतर एक वांगे तयार झाले व एक वांग्याच्या (राजकन्येला) मुकुट पण …. चला आता हे प्रकरण उद्यापर्यंत सांभाळून शाळेत गेले कि वांगे भांड्यात पडले …. अबब आय मीन टु  से जीव भांड्यात ….

सकाळी लेकीच्या गळ्यात वांगे अडकवून, डोक्यावर मुकुट घालून गाडी काढली आणि कसे बसे गेट पर्यंत गेलो … तोपर्यंत वांग्याचा बेल्ट तुटला …. चल परत ३ पार्किंग ला , तीन मजले  असे सगळे करत घरी आलो , गडबडीत चीकटवणार  कुठे म्हणून स्टेपलरचा शोर्टकट मारला परत वांग्याची वरात गाडीवर….
शाळेत पोहोचवले … कधीही शांत न बसणारी लेक फोटोला अगदी व्यवस्थित थांबली … असे पाहून अस्मादिकांची गाडी परत घरला….

तोवर नवरोबाचे वांगे झाले होते म्हणून तातडीने दवाखान्यात गेलो … पण आमच्या इतकी तातडी त्यांना नसल्याने १-१.५ तास कळवळत वाट पाहिल्यावर डॉक्टर साहेब आले …. आमच्या साहेबाना पडद्याआड नेले … हम्म काय होतंय …. पोटात दुखतंय … कळ येते का सलग दुखते …. आआ …. ( कदाचित डॉक्टरांनी दुखरी नस पकडली होती )  … अजून काही असे संवाद करून दोघेही बाहेर आले…. चला अडमीट व्हावे लागेल…. ऑ … लगेच …. हो अर्जेंट आहे … अपेंडिक्स आहे आणि पिकला आहे … लगेच ऑपरेट करावे लागेल …. मला सगळे आठवत होते… सासू सासरे गावाला चालले आहेत …. लेक शाळेत … हेल्थ इन्शुरन्स…. साहेबंचे ऑफिस…घाबरले म्हणण्यापेक्षा निकड जाणवली लगबग करण्याची …. वॉर फुटिंग वर कामे ….  अजून होतो तिथेच होतो …. म्हणजे डॉक च्या केबिन मध्ये ….  इतका वेळ का  दाखवायला यायला … तुमचे ऑपरेशन खरतर २४ तासांच्या आधी व्हायला हवे होते …. मी…  आम्ही गारेगार…

कॅजूअल्टीला अडमीट करा….  मी लेटर देतो … सोनोग्राफी करा … रक्त लघवी तपासा …. असे सगळे कामे ओळीने होती तसेच  हेल्थ इन्शुरन्सचे बघा हेही एक महत्वाचे काम होते …. नवर्याला कॅजूअल्टीला सोडून तिथले सह्या व इतर गोष्टी करत इन्शुरन्सच्या लाडकीला भेटले … एक लिस्ट आणि हि हि कागदपत्रे झेरोक्स असे घेऊन मी नवर्याला सोनोग्राफीला सोडून झेरोक्स साठी बाहेर …. इतकी काळजी वाटत होती त्याची … पण मला त्याच्या बरोबर राहता येत नव्हते … बिचारा दुखाण्यातही बर्याचश्या टेस्टन एकटाच सामोरे जात होता …. ११ वाजले घरी फोन केला सासूबाई ना  सांगितले … लेकीला आणायला … तोवर सासरे गेले होते गावाला … परत दानाख्याची लढाई सुरु २ चा मुहूर्त निश्चित झाला… त्याआधी सगळे करणे गरजेचे होते …. शेवटी इन्शुरन्सची वाट न पाहता पैसे भरले आणि आता नाहीच आले अप्रोवल तर नंतर क्लेम करू असा विचार केला … आणि नवर्याला गाठले…. चाकाच्या खुर्चीवर बसून त्याला नेताना पाहून पोटात गलबलले एकदम …. कायम घट्ट पर्वतासारखा बघून सवय, उगाच डोळे भरून आले…. शेवटी २ वाजले … ओटी चा दिवा लागला आणि माझ्या अस्वस्थ फेर्या सुरु …. तोवर लेक आणि सासू बाई आल्या… एक नणंद आली …. एका डॉक्टर नणंदेचा फोन आला कि मी निघाले आहे… संध्याकाळी पोहोचेन …. त्यामुळे एकटे पण संपले … धावपळ  तर आधीच संपलीच होती… आता फक्त काळजी करायची होती ….

लेकीने आल्या आल्या सांगितले …. आई आई , आपले वांगे मिसनी दिलेच नाही …. शाळेतच ठेवले … :-(
तीच समजूत घालून मी काचेच्या भागातून आत बघत होते …

No comments:

Post a Comment