Wednesday 18 March 2015

गरजा - एका स्त्रीच्या

कुटुंब, घर, घरपण, जिव्हाळा, या सार्या एकमेकांना जोडणाऱ्या गोष्टी…. इथे काय महत्वाचे नाते कि स्वाभिमान , नाते कि आपले मन… कधी कधी विचार करून आपले डोके दुखू लागते पण विचार संपत नाहीत लहान- लहान म्हणून सांभाळायचे आणि मोठे -आदर म्हणून गप्प बसायचे …

खरच एका स्त्रीला नक्की हवे तरी काय असते असा विचार केला तर तिला स्वातंत्र हवे असते, काही निर्णय काही गोष्टी ठरवण्याचे, आता यात पण गम्मत आहे बरका कारण कधी कधी काही बायका मला हवे तसे म्हणता म्हणता अगदी सुटलेल्या असतात आणि काही ठिकाणी मात्र तिला काय वाटते किंवा तिलाही काही वाटत असेल हे कोणाच्या गावीपण नसते … हि दोन्ही टोके आपल्याच समाजात आहेत.  अगदी खेडवळ किंवा रानटी वाटणाऱ्या ठिकाणी सुद्धा स्त्रीला निर्णय स्वातंत्र मिळत असते पण सुशिक्षित किंवा उच्चविद्याविभूषित व्यक्ती हे मान्य करतातच असे नाही.

मी हवी आहे कोणाला तरी हि भावनाच खूप आनंददायक आहे, आणि एका बाईसाठी तर खूप महत्वाची आहे. शाळेतून आलेल आपल पिल्लू  जेंव्हा आपल्या गळ्यात पडून आपल्याला दिवस भराचे गोष्टी सांगत तेव्हा प्रत्येक आई सुखावतच असते, नवरा आल्यावर तिला वेळ देतो सुखादुखाच्या गोष्टी करतो तेव्हा तिला समाधान वाटते. आणि याला कोणत्याही वयाचे बंधन नाही, आयुष्याच्या सर्व वळणावर हे सारे तिला हवेच असते…. एका स्त्रीला आनंदी ठेवायचे असेल तर फार पैसे खर्च करावे लागतात हा समस्त पुरुष जमातीचा गैरसमज आहे ( अर्थात याला अपवाद असतीलच) तिला तिचा असा तुमचा वेळ द्या, तिचे थोडे कौतुक करा, तुम्हाला तिची गरज आहे असे खरेपणाने आणि प्रांजळपणे तिच्याकडे कबुल करा,  मग बघा तिच्या मनाचा मोगरा कसा तुमच्या साठी फुलतो.

बर्याचदा एकत्र कुटुंबात राहत असताना ( हल्ली सासू, सासरे, नवरा , बायको आणि मुले असेच) तिला तिच्या मताला किंमत नाही असे वाटू लागते, कदाचित करत असेल ती हट्ट, पण त्या क्षणाला तिचे वडील होऊन पहा आणि तिला कवेत घ्या. तीही खूप वेळा तुमची आई होत असते तिच्याही नकळत…. ती तिच्या अशा सार्या गोष्टी खूप मागे सोडून आली आहे फक्त तुमच्यासाठी, तिला जरा सांभाळून घ्या. तिला तिचे असे अनुभव घेऊ द्या. फक्त एवढ्या गोष्टी जर तिला सासरी नक्की मिळत असतील तर कोणतीही मुलगी सासूसासरे नको म्हणणार नाही





No comments:

Post a Comment