Wednesday, 18 March 2015

गरजा - एका स्त्रीच्या

कुटुंब, घर, घरपण, जिव्हाळा, या सार्या एकमेकांना जोडणाऱ्या गोष्टी…. इथे काय महत्वाचे नाते कि स्वाभिमान , नाते कि आपले मन… कधी कधी विचार करून आपले डोके दुखू लागते पण विचार संपत नाहीत लहान- लहान म्हणून सांभाळायचे आणि मोठे -आदर म्हणून गप्प बसायचे …

खरच एका स्त्रीला नक्की हवे तरी काय असते असा विचार केला तर तिला स्वातंत्र हवे असते, काही निर्णय काही गोष्टी ठरवण्याचे, आता यात पण गम्मत आहे बरका कारण कधी कधी काही बायका मला हवे तसे म्हणता म्हणता अगदी सुटलेल्या असतात आणि काही ठिकाणी मात्र तिला काय वाटते किंवा तिलाही काही वाटत असेल हे कोणाच्या गावीपण नसते … हि दोन्ही टोके आपल्याच समाजात आहेत.  अगदी खेडवळ किंवा रानटी वाटणाऱ्या ठिकाणी सुद्धा स्त्रीला निर्णय स्वातंत्र मिळत असते पण सुशिक्षित किंवा उच्चविद्याविभूषित व्यक्ती हे मान्य करतातच असे नाही.

मी हवी आहे कोणाला तरी हि भावनाच खूप आनंददायक आहे, आणि एका बाईसाठी तर खूप महत्वाची आहे. शाळेतून आलेल आपल पिल्लू  जेंव्हा आपल्या गळ्यात पडून आपल्याला दिवस भराचे गोष्टी सांगत तेव्हा प्रत्येक आई सुखावतच असते, नवरा आल्यावर तिला वेळ देतो सुखादुखाच्या गोष्टी करतो तेव्हा तिला समाधान वाटते. आणि याला कोणत्याही वयाचे बंधन नाही, आयुष्याच्या सर्व वळणावर हे सारे तिला हवेच असते…. एका स्त्रीला आनंदी ठेवायचे असेल तर फार पैसे खर्च करावे लागतात हा समस्त पुरुष जमातीचा गैरसमज आहे ( अर्थात याला अपवाद असतीलच) तिला तिचा असा तुमचा वेळ द्या, तिचे थोडे कौतुक करा, तुम्हाला तिची गरज आहे असे खरेपणाने आणि प्रांजळपणे तिच्याकडे कबुल करा,  मग बघा तिच्या मनाचा मोगरा कसा तुमच्या साठी फुलतो.

बर्याचदा एकत्र कुटुंबात राहत असताना ( हल्ली सासू, सासरे, नवरा , बायको आणि मुले असेच) तिला तिच्या मताला किंमत नाही असे वाटू लागते, कदाचित करत असेल ती हट्ट, पण त्या क्षणाला तिचे वडील होऊन पहा आणि तिला कवेत घ्या. तीही खूप वेळा तुमची आई होत असते तिच्याही नकळत…. ती तिच्या अशा सार्या गोष्टी खूप मागे सोडून आली आहे फक्त तुमच्यासाठी, तिला जरा सांभाळून घ्या. तिला तिचे असे अनुभव घेऊ द्या. फक्त एवढ्या गोष्टी जर तिला सासरी नक्की मिळत असतील तर कोणतीही मुलगी सासूसासरे नको म्हणणार नाही





Sunday, 1 March 2015

अनोळखी शेजार

hello मैत्रिणींनो,

कशा आहात ?…. खरे तर मला माहित नाही…. हि पोस्ट कोण वाचताय ते …. पण तरीही …. मला तर हे प्रवासात असलेल्या आपल्या शेजार्यासारखे वाटतंय… कारण …. ती व्यक्ती कोण आहे, कशी आहे, यापेक्षा तिचा आणि आपला direct कोणताही संपर्क नाही म्हणून आपण तिच्याशी अतिशय खरे आणि मनातले बोलतो… diary सारखे कारण आपल्याला माहित असते हि माणसे  परत आपल्याला भेटणार नाहीत, आणि आपण जर आपल्या मनातले त्यांना सांगितले तरी त्याचा ते कोणत्याही प्रकारचा स्वतः च्या स्वार्थाकरिता वापर करू शकणार नाहीत हे माहित असते…. मलाही असेच वाटते आहे… आपण फक्त आपले मन मोकळे करायचे आणि बोलायचे आणि ऐकायचे …शब्दांच्या पावसात चिंब भिजायचे…. मन शांत झाले कि आपापल्या stop ला उतरायचे …. मला खूप आवडतो प्रवास …. आणि शक्यतो public transport …. खूप बोलतात इथे लोक… एखादी भारी वातानुकुलीत बस जिथे सारे जन खादडत आणि एखादा लावलेला टुकार सिनेमा पाहत असतात कोणताही नवा अनुभव न घेता …. या पेक्षा सध्या गाड्या कशा खरे समाज जीवन दाखवतात …. मला तर अशाच गाड्यांमध्ये आपुलकीचे खूप अनुभव आले आहेत … या लिहिण्याच्या प्रवासातील अनुभवांची मी वाट पाहते आहे 
 ता. क. - आज खरे तर मी एक पाककृती ( recipe ) लिहिणार होते पण मनाने काही वेगळेच लिहिले … तो प्रयोग परत कधीतरी टाकेन 

Friday, 30 January 2015

चौघीजणी



गेल्या आठवड्यात चौघीजणी वाचले… खरतर मी या अत्यंत सुंदर आणि मृदू पुस्तकाची पारायणे केली आहेत … जवळजवळ पाच वर्षा पूर्वी मला ते मिळाले …. आणि मी वेडी झाले या साठी शक्य तेवढ्या वेळा मी हे पुस्तक भरभरून वाचले आहे … लुईसा मे अल्कोट चे अप्रतिम लिखाण आणि शान्ता शेलाकेंचे अनुवादन …. अतिशय तरल, मऊ,  मनाला स्पर्शून जाणारे लेखन …. जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वीचे, दूर देशातले, विभिन्न सामाजिक परिस्थितीतले पण तितकेच आपले, घरातले मनातले….

काही वेळा मला यांचा अतिशय हेवा वाटतो…. मी का नाही त्यातली एक…. ते प्रेम, जिव्हाळा, प्रत्येकाचे लहान मोठे गुण अवगुण ओळखून त्यांना मार्मि आणि पापांनी दिलेला आधार… उत्कट लॉरी, सुंदर मेग, धाडसी ज्यो, निष्पाप बेथ, कलाकार अमी…. अगदी आदर्श नाती आणि घर …. आपल्याला प्रेमाच्या नात्यात गुंफणारे, त्यांच्या प्रेमात पाडणारे….

कधी खूप एकटे पण वाटला, मन भरून आले, खूप low वाटले तर हमखास हे पुस्तक सहज उघडावे आणि जे उघडेल त्या पानापासून पुढे वाचण्यास सुरु करावे असे माझे कितीदा  तरी झाले आहे…. आणि प्रत्येक  पानावरून अतिशय मृदू भाषेत आपली समजूत घालते हे पुस्तक…. इतक्यांदा हे पुस्तक वाचूनही काही विशिष्ठ प्रसंगी माझे डोळे भरून येतात आणि झरझर पाणी वाहू लागते आणि मनातले सगळे वाहून जाऊन आपण परत फ्रेश…. खरच जर पुढचा जन्माचा choice असेल तर मला  नक्कीच त्यांच्यात जायला आवडेल ….  

Wednesday, 21 January 2015

आईपण

आई आणि मुलं

                   जन्माच्या आधीपासून जोडलेलं नातं, किती तरी  बोलला गेलेला विषय… आज मी काय लिहाव यावर आणि काय बोलवे… सर्वाना वाटते आई  होणे म्हणजे परमानंदाची स्थिती… आईपण म्हणजे स्त्रीत्वाचे साफल्य…. तिची जबाबदारी… मुल असणे व नसणे हे तिच्या अस्तित्वाशी जोडलेलं…. पण हे आईपण एखाद्या स्त्रीला नको असू शकते किंवा कधी हवे आहे याचा निर्णय तिला घ्यायचा असेल तर …. आपला समाज , विचार , रूढी तिला खरच  देतात का हा हक्क  …?

                   का येते तिला दडपण आता मुल नको हे कबूल करताना….? किंवा मला नकोच मुल असे म्हणताना … सासर, माहेर हे सारे का नाही तिला निर्णय घेऊ देत… आपल्या शरीरात पोसणारा जीव, आपला अंश, जन्माला घालताना होणारा प्रचंड शारीरिक त्रास, नंतर मुल  मोठे करताना होणारी दमछाक हे सर्व बाईनेच निभवायचे असले तरी तिला हक्क नाही निर्णयाचा असे का ….? बहुतेक स्त्रिया मनातून आई व्हायला आतुर असतात…. पण तरीही आपले मुल कधी असावे या बद्दल त्यांची काही मते असतात. बहुतेक वेळेला हि मते विचारात घेतली जात नाहीत आणि तिला पटवून दिले जाते कि आता लगेच बाळासाठी प्रयत्न करणे किंवा लांबणीवर टाकणे हे खूप महत्वाचे आहे… वय, आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्थिती या सर्वापेक्षा जास्त महत्वाचे आहे आईची मानसिकता , तिची तयारी, तिच्या इच्छा कारण हे शिवधनुष्य तिला पेलायचे आहे… खरच त्या वेळेला आई -वडील आणि बाल यांच्यातील नाते प्रेम घट्ट असेल जेंव्हा आई शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आईपण पेलण्यासाठी तयार असेल…. आणि आता आपण सर्वांनी तिला तो हक्क दिला पाहिजे. 

                   मी माझ्या आजूबाजूला किती वेळा अशी परिस्थिती पाहिली आहे कि नवरा सासरचे लोक ठरवतात कि आता आपल्याला मुल हवे पण तिला विचारलेच जात नाही जिला हे सर्व करायचे आहे , माझे असे म्हणणे नक्कीच नाही कि फक्त आईच्या मताप्रमाणे ठराव्या सार्या गोष्टी…. पण तिचेही मत विचारात घेतले जावे इतकीच अपेक्षा आहे… आणि हे समाजाच्या साऱ्या स्तरातून व्हावे, मी खूप वाट पाहत आहे याची.



Monday, 12 January 2015

तुझ्याजवळ

तुझ्याजवळ अगदी जवळ राहावे असेच सतत मला वाटते……

कधी कधी वाटते तुझा मोबाईल व्हावा, म्हणजे कायम मला जवळ ठेवशील
पण परत वाटते मोबाईल out of coverage गेला तर…….

कधी कधी वाटते तुझा keyboard व्हावे, म्हणजे कायम मला जवळ ठेवशील,
कुरवाळशिल, सतत तुझे हात माझ्या अंगावरून फिरत राहतील आहा हा हा
पण परत वाटते राग आला तर keyboard आपटलास तर….

कधी वाटते तुझी गाडी व्हावे, म्हणजे तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या बरोबर असेल,
average कमी झाले म्हणून गाडी बदललीस तर….

कधी वाटते तुझी सावली व्हावे,म्हणजे तुझ्या प्रत्येक क्रियेला प्रतिसाद देईन मी,
पण रात्र झाली आणि मी एकटी पडले तर….

कधी वाटते तुझे स्वप्न व्हावे, आणि तुझ्या  नवनवीन ध्येयामध्ये तुला साथ द्यावी
पण रात्र संपल्यावर तू डोळे उघडलेस तर…..

कधी वाटते तुझा श्वास व्हावे, सतत तुझ्यामध्ये सामाऊन जावे,
पण कधी श्वासाने साथ सोडली तर……

काय करू असे काय होऊ मी कि मी कायम तुझ्या बरोबर असेन…?

मी तुझा आत्मा होइन… आणि सतत तुझ्यात असेन तुझ्या बरोबर असेन
 मग तू कोठेही असशील तरी मी तुझी साथ देईन कायम….



Saturday, 27 December 2014

Athavaninchi Sathavan

                 आजच दुपारी बाबांचा फोन आला आणि त्यांच्याकडून दिलीपकाकांच्या बद्दल कळाले…. गेल्या कितीतरी वर्षात मी त्यांना भेटलेही नव्हते पण तरीही ते गेल्याची बातमी ऐकून खरच खूप सुन्न व्हायला झाले… खरतर ते बाबांचे मित्र आणि काही काळ आमचे भाडेकरू पण… त्यांना माझ्याबद्दल प्रचंड जिव्हाळा आणि प्रेम… नंतर शिक्षणात आणि कामात busy झाल्यामुळे संपर्क हळू हळू कमीकमी झालेला… पण तरीही वाटणारे प्रेम मात्र अगदी तसेच…

                  मग विचारांचा ओघ सुरु झाला… आणि माझ्या बालपणात आपापल्या मायेचे घट्ट धागे गुंफाणाऱ्यांची आठवण एका मागोमाग एक येऊ लागली… दिलीप काका, बाबांचे एक कामगार जाधव काका, मेसवाल्या काकू, एक जुन्या भाडेकरू कला काकू, अजून एक भाडेकरू भालू काका …. पण विचारांचा ओघ थोडा कमी झाल्यावर अचानक असे लक्षात आले कि यातील बरीच मंडळी काळाच्या पडद्या आड गेली आहेत…. मग मात्र खूप एकटे वाटू लागले विनाकारण डोळे सतत भरून येऊ लागले… आवाज जड होऊ लागला….

                 जरा  सगळे परत स्थिर झाल्यावर कारण शोधण्याची धडपड सुरु झाली…. बराच विचार केल्यावर लक्षात आले कि हि सगळी माणसे कितीतरी वर्षात आपल्याला भेटली नाहीत म्हणून आपले कुठेच अडले नवते… पण तरीही न भेटता न बोलता आमचे नाते relation मात्र खूप छान होते… या सार्यांनी माझ्या अगदी निर्व्याज प्रेम केले अगदी कसलीही अपेक्षा न ठेवता…. म्हणून कदाचित हि सारी नाती मला खूप प्रिय होती आणि आजही आहेत… आणि आता इतके दुख याचेच होत आहे कि आपल्यावर असे घट्ट प्रेम करणारी माणसे मात्रे हळू हळू चालली अहेत…. मला अगदी एकटे किंवा काही अंशी पोरके करून… हे दुखते आहे …. खोल कुठे तरी…. हे धागे सुटत आहेत… माझी मात्र धरून ठेवायची फोल धडपड सुरु आहे….

Missing You All

Thursday, 25 December 2014

Today - The best X-mas


            आज सकाळीच माझं पिल्लू मस्त गोड साखरझोपेत  होते आणि माझ्या नवर्याने संताक्लोजची टोपी आणि मुखवटा घालून तिला उठवले इतक्या आनंदाने ती हसत उठली त्यानंतर आवडते चोकोलेट…. जाम खुश स्वारी … आता सुट्ट्या लागल्या आहेत ना… तिला बिलकुल अपेक्षा नव्हती अशा सकाळीची… आज आम्ही तीघेपण खूप खुश आहोत .

            खरच किती छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद आपण घेऊ आणि देऊ शकतो… पण या गोष्टी मन दुखावताना का लक्षात येऊ नयेत…. मला बर्याचदा असे वाटते कि आपण अनोळखी किंवा फक्त तोंड ओळख असणार्यांशी चांगले आणि सुहृदतेने वागतो पण जवळच्या आपल्या अशा माणसांशी कधी कधी कारण नसताना कठोरतेने वागतो…. कदाचित जवळचे आहेत समजून घेतील या भ्रमात आपण असतो… पण या सर्व गोष्टी मनात कुठे तरी खोलवर रुजत असतात आणि साठत असतत… एखादे गढूळ पाण्याचे डबके साचावे तसे…. आणि मनातल्या मायेवर, प्रेमावर शेवाळाचा थर  चढवतात. नव्या लिखाणाबरोबर खरच साऱ्यांची मने जपण्याचा छोटासा प्रयत्न मी तरी सुरु केला आहे.